एसडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत देणार!

शेवगाव व पाथर्डी तालुक्यात पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाला एसडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीमुळे महावितरणचे काम थांबले, तर संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले उपस्थित होते.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले आहे. दोन दिवस त्या ठिकाणच्या भागाची पाहणी केली. त्यावेळी केलेल्या सूचनांच्या संदर्भात आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान विमा योजनेंतर्गत 15 हजार शेतकऱ्यांचे इंटिमेशन फॉर्म भरवून घेण्यात आले आहेत. दलदलीमुळे महावितरणला काही ठिकाणी पोल उभारता येत नाहीत. मात्र, इतर ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीअभावी काम थांबले नाही पाहिजे; अन्यथा कारवाई केली जाईल. ज्या ठिकाणी महावितरणला दलदलीमुळे काम करता येत नाही, अशा ठिकाणी प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या कालावधीत महावितरणसंदर्भात तालुकानिहाय आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीत 52 मोठी, 196 लहान जनावरे, ओढकाम करणारे 10 जनावरे, तर लहान 4 जनावरे तसेच कुकुटपालन पक्षी 109 दगावले आहेत. पुराच्या पाण्यात 4 हजार 500 कुकुटपालन पक्षी, 25 बैल, 58 वासरू, 700 ते 800 शेळ्या-मेंढय़ा, 200 दुधाळ प्राणी वाहून गेले आहेत. 330 विहिरींचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यातील पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचा सुमारे 10 कोटी 73 लाखांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

पालकमंत्र्यांचे नगरवर लक्ष

नैसर्गिक आपत्तीत पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगरला आले नसल्याकडे मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले असता, पालकमंत्री मुश्रीफ यांचे नगर जिह्यावर लक्ष असून, ते जिल्हा प्रशानसनाच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी व शनिवारी ते जिह्यात येत आहेत. त्यांच्या सूचनेवरूनच आपण नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे. नुकसानाची सगळा गोषवारा त्यांच्या कानावर घातला आहे, असेही राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.

माझ्या कचाटय़ात आला तर हयगय नाही

रोहित्रे बसवण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पैसे मागत असल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. श्रीरामपूरला अशा तक्रारी झाल्यावर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली गेली आहे. अशाच पद्धतीने जिह्यातील सर्व तालुक्यांतून आता अशा बैठका घेणार असून, पैसे मागणारा माझ्या कचाटय़ात सापडला तर त्याची हयगय केली जाणार नाही, असा इशाराही राज्यमंत्री तनपुरे यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या