
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी शहरात गुढीपाडव्यासाठी विक्री करण्यात येणाऱ्या साखरेच्या गाठीचे दुकान लावण्यावरून सावत्र भावांत झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गुढीपाडव्याच्या सणाचा गोडवाच हरवला आहे.
शहरातील बाजारपेठेचा भाग असलेल्या गुजरी बाजारात पाडव्यानिमित्त साखरेच्या गाठ्या विक्री करण्यासाठी तात्पुरती दुकाने लावली जातात. गुरुवारी सकाळी हे दुकान लावत असताना सोमनाथ लक्ष्मण आळणे आणि त्याच्या इतर दोन भावात वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. लोखंडी रॉड, चाकूने सोमनाथ याच्यावर दोन भावांनी हल्ला केला. या मारहाणीत जखमी झालेल्या सोमनाथ यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालय परिसरात आणि घटनास्थळी बघ्यांची देखील गर्दी जमली होती. काही काळ तणाव निर्माण झाल्याने बाजारपेठ बंद झाली. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

























































