
शेअर बाजाराची सुरुवात या आठवड्यात दमदार झाली होती. सोमवारी बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराने 60 हजाराचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दोन दिवस बाजारात तेजी होती. मात्र, शुक्रवारी शेअर बाजाराची घसरगुंडी झाली असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बाजारात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1,093.22 अंकांनी घसरून 58,840.79 अंकांवर आला होता. तर निफ्टीमध्येही 346.55 अंकांची म्हणजे 1.94 टक्क्यांची घसरण झाली आली असून तो 17,550 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 285.9 लाख कोटी रुपयांवरून 279.8 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.
शेअर बाजारात विक्रीच्या वातावरणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित भीती असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक बँकेच्या अहवालात 2023 मध्ये जगात पुन्हा आर्थिक मंदी येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत फिच रेटिंगने हिंदुस्थानच्या जीडीपी वाढीच्या अंदाजावर कात्री लावली आहे. फिच रेटिंग्सचा ताजा अंदाज आहे की अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढेल. अमेरिकन सेंट्रल बँक फेड रिझर्व्हच्या बैठकीबाबत पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यूएस फेड रिझर्व्ह सलग तिसऱ्यांदा व्याजदर वाढवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील आठवड्यात फेड रिझर्व्हची बैठक होण्याची शक्यता आहे. या जागतिक घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
निर्देशांकातील हेवीवेट शेअर्सच्या विक्रीमुळेही शेअर बाजारात घसरण झाली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसह सर्व कंपन्यांचे शेअर घसरले. रिलायन्स, एअरटेल सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील घसरण दिसून आली.






























































