झेंडा काढल्यावरून मारफळा येथे तणाव, दगडफेकीत १० जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष भोसले, गेवराई

चौकाचे विनापरवाना नामकरण करून लावलेला झेंडा काढल्याच्या कारणावरून दोन गटात जबर हाणामारी आणि दगडफेकीची घटना शनिवारी (ता. ७)तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील मारफळा फाटा येथे घडली. या दगडफेकीत दहा जण जखमी झाले आहेत. गोरसेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील मारफळा फाटा येथे मारफळा गावात जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी दि, ६ रोजी गोरसेनेचा झेंडा लावून चौकाची स्थापना केली. झेंडा मध्यभागी न लावता एका एका बाजूला लावण्याची ग्रामस्थांची विनंतीही या कार्यकर्त्यांनी ऐकली नाही. तसेच चौकाचे जयसेवालाल असे नामकरण केले. यामुळे मारफळा ग्रामस्थांनी तलवाडा पोलीस ठाण्याला तक्रार दिली व पोलिसांच्या मदतीने झेंडा काढण्यात आला.

झेंडा कोणी काढून नेला हे गोरसेनेच्या कार्यकर्त्यांना न कळल्यामुळे त्यांनी शनिवारी मारफळा गावातुन फाट्याकडे येणाऱ्या ग्रामस्थांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी नंतर दगडफेक सुरू झाली. या मारहाणीमध्ये मारफळा गावातील जालींदर कादे, बळीराम गिरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नारायण डरफे, योगेश गिरी, राधाकिसन भिसे, सचिन भिसे, अगद कुटे, जयराम गिरी, गोवर्धन घाडगे, अमोल कादे, दीपक कांबळे, अनावर बेग आदी जखमी झाले असून त्यांना जातेगाव, गेवराई, व तालखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणाखाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले व परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलीसांनी सांगितले.