
सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ
परळीहून धर्मापुरीकडे जाणाऱ्या एसटी बसवर अज्ञातांकडून शुक्रवारी सकाळी तुफान दगडफेक करण्यात आली. परळी – धर्मापूरी ही बस धर्मापुरीकडे जात होती त्यावेळी ही दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये बसच्या सगळ्या काचा फुटल्या असून बसचे नुकसान मोठे नुकसान झाले आहे. ही घटना परळी धर्मापूरी रस्त्यावरील कासारवाडी फाट्याजवळ झाली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
दगडफेकीचे आणि बसफोडीचे हे सत्र गुरुवार पासूनच सुरू झालेले आहे.गुरुवारी सायंकाळी परळीपासून जवळच असलेल्या दगडवाडी पुला जवळ कॅनालवर लातुर -परभणी ही बस परळीहून परभणीकडे जात असताना या गाडीवर दगडफेक झाली. या मध्ये बसचे नुकसान झाले व काचा फुटल्या आहेत. चालकाने जागेवर बस थांबवली त्यामुळे दगडफेक करणारे पसार झाले. तर धर्मापूरी फाट्याजवळ पंढरपूर- गंगाखेड या गाडीवरही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलीय. यामध्ये बसच्या समोरील व मागील काचा फुटलेल्या आहेत. याही घटनेमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.एकीकडे परळीत बुधवारपासून मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे अशा बसफोडीच्या घटना होत आहेत.पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.































































