स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेला लोकायुक्तांची तंबी, 23 एप्रिलपूर्वी लेखी उत्तर देण्याचे आदेश

मुंबईतील स्ट्रीट फर्निचर घोटाळय़ाप्रकरणी लोकायुक्तांनी आज महापालिकेला चांगलेच धारेवर धरले. 23 एप्रिलपूर्वी लेखी उत्तर द्या असे आदेश लोकायुक्तांनी दिले.

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी या घोटाळय़ाप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीला आदित्य ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित होते. 23 एप्रिल रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. याची माहिती आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून दिली.

निर्लज्ज सीएमचे कॉण्ट्रक्टरला संरक्षण
भाजपच्या एका आमदाराने या प्रकरणी श्रेयासाठी गेल्या वर्षी विधानसभेत टेंडर रद्द झाल्याचे जाहीर केले. तरीही निर्लज्ज आणि घटनाबाह्य ‘सीएम’ उघड उघड कॉण्ट्रक्टरला संरक्षण देत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजपच्या आमदाराने विधानसभेची दिशाभूल का केली आणि भाजपने या घोटाळय़ावर ‘यू टर्न’ का घेतला, असा सवाल त्यांनी केला.

‘सीएम’च्या कॉण्ट्रक्टर मित्रांना पाठीशी घालण्यासाठी पालिका आयुक्तांचे प्रयत्न
आज सुनावणीच्या पहिल्याच दिवशी घटनाबाह्य ‘सीएम’च्या कॉण्ट्रक्टर मित्रांना पाठीशी घालण्यासाठी पालिकेच्या आयुक्तांचे सुरू असलेले प्रयत्न, भ्रष्टाचार पाहून मी थक्क झालो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. कॉण्ट्रक्टरला मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता निविदेचे विभाजन केले आहे. निविदेची छाननी सुरू असताना आणि त्याबाबत लोकायुक्तांसमोर सुनावणी असूनही 211 कोटींची निविदा काढण्यात आली आहे, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.