
आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थिनीचे कपडे फाडून तीन मोटरसायकलस्वारांनी या घटनेचा व्हिडीओ बनवल्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली असून, शेकडो संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी या घटनेबद्दल मोर्चा काढून निदर्शने केली. महिला हॉस्टेलजवळ बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या आवारात रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत सर्व बॅरिकेड्स उभे करावेत असे आदेश रजिस्ट्रार राजन श्रीवास्तव यांनी दिले आहेत.
पंतप्रधानांच्या मतदारसंघातच मुली-महिला सुरक्षित नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच जर महिला, मुलींसोबत अशी गैरकृत्ये होत असतील तर मुलींनी शिक्षण घ्यायचे तरी कसे, त्यांना सुरक्षेची हमी कोण देणार, असे प्रश्न विचारत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघात एक विद्यार्थिनी तिच्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातही आता निर्भयपणे वावरू शकणार नाही का, असा सवाल त्यांनी केला. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा नारा देणारे आणि महिला सुरक्षेचा दावा करणारे कुठे आहेत? उत्तर द्या! अशी विचारणा उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवरून केली आहे.
























































