पुरातन सप्तेश्वर मंदिर साफसफाईचा जागर; पुरातन ठेवा , संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संधी मिळाली की सर्जनशीलतेला आपोआप वाव मिळतो. कोरोनाच्या काळात अनेक दिवस महाविद्यालये बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी घरातच अडकले होते. मात्र, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसंस्कार शिबिराने विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव मिळाला आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय संगमेश्वरचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रमसंस्कार शिबिर यावर्षी कसबा येथे आयोजित करण्यात आले होते. श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात साफसफाई, शोषखड्डे तसेच गावातील पुरातन मंदिरे स्वच्छता पायवाटा स्वच्छता असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते.

कसबा गावाच्या टोकाशी असलेले आणि पुरातन ठेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सप्तेश्वर मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये नेहमी गजबजलेली असणारे ठिकाण सध्या अनेक सेवा सुविधांपासून दूरच आहे. श्रमसंस्कार शिबिरार्थी विद्यार्थ्यांकडून या भागात साचलेला कचरा साफ करून या मंदिरातील परिसराला पूर्वीचा लूक देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. चारी बाजूला डोंगराळ परिसर, अरुंद पायवाटा असल्याने जंगलमय परिसरात अनेक जंगली जनावरे या ठिकाणी पाणवठयांवर येतात. जंगली जनावरांना पाणवठा उपलब्ध व्हावा म्हणून तीन बंधारे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बांधले. ग्रामस्थांच्या मदतीने बांधलेल्या या बंधाऱ्यात पाणी साचू लागले आहे. तसेच वाडीतून जाणारा रस्त्याची साफसफाई विद्यार्थ्यांनी केली. सौंदर्यदृष्ट्या नटलेल्या या गावात पाने फुलांची काहीही कमतरता नाही . पाना,फुलांना आकार देत विद्यार्थ्याने अनेक रांगोळी साकारल्या. श्रम संस्कार शिबिरांमध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृत्रिमता दूर ठेवत नैसर्गिक ठेव्यातून साकारण्याचा प्रयत्न केला जातो. पाना फुलांतून विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूमुळे आपत्ती तसेच युद्ध परिस्थिती आदी विविध विषयांना हाताळण्याचा प्रयत्न केला.

संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी नैसर्गिक संपत्ती कशी जपावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच पुरातन ठेवा जपणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. सप्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी अनेक मोठे वृक्ष आहेत. पानझडीच्या वेळी वृक्षाची अनेक पाने गळून परिसर अस्वच्छ होतो. सप्तेश्वर मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी केलेले साफसफाई ही कायमस्वरूपी नसली तरी पुरातन ठेवा आपलाच आहे आणि त्याचे जतनही आपणच केले पाहिजे ही विद्यार्थी मनात पेरलेली बीजे अनेक पिठयाना मार्गदर्शनपर ठरणारी आहेत.