
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. लोक देखील त्याची शहानिशा न करता फॉरवर्ड करतात. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर एका पुस्तकाचा फोटो शेअर केला जात असून यात ‘हुंड्याचे फायदे’ लिहिल्याचे दिसून येत आहेत. गुजरात बोर्डाच्या एका पुस्तकातील हा मजकूर असून लाखो मुलांना हे शिकवले जात असल्याचा दावा सोशल माध्यमांवर करण्यात आला आहे. हे ट्वीट 330 लोकांनी रिट्विट केले आहे.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या पानामध्ये हुंड्याचे समर्थन करण्यात आले असून याचे फायदेही नमूद करण्यात आले आहे. ‘ज्यांचा चेहरा सुंदर नसल्याने लग्न जमत नाही त्यांच्यासाठी हुंडा पद्धत योग्य आहे. तसेच ज्या हँडसम तरुणांना लग्न करायचे नाही त्यांना हुंड्याचे आमिष दाखवून आकर्षित करता येते. हुंड्यामुळे महिलेची कुटुंबात इज्जत वाढते’, असे फायदे यात नमूद करण्यात आले आहेत. परंतु 1961 कायद्याने हुंड्याला अपराध घोषित केले आहे. त्यामुळे असे पुस्तक गुजरात बोर्ड कसे प्रकाशित करू शकते असा सवाल सुरू झाला.
काय आहे सत्य?
प्रसारमाध्यमांनी याचा पाठपुरावा केला असता व्हायरल होणारे पुस्तकाचे पान गुजरात बोर्डाचे नसल्याचे दिसून आले. हे पुस्तकाचे पान बंगळुरूतील सेंट जोसेफ कॉलेजच्या सोशियॉलॉजी डिपार्टमेंटद्वारा 2017 मध्ये मागवण्यात आलेल्या अवांतर वाचणातील पुस्तकाचे असल्याचे सिद्ध झाले.























































