
सुनील उंबरे । पंढरपूर
राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पंढरपुराच्या यमाई तलाव येथे भव्य असं ‘तुळशीवन’ उभारलं जात आहे. पंढरपूरच्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या सव्वाचार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जमिनीला धर नसलेल्या काळ्या मातीवर हा प्रकल्प उभारला जात असल्याने अल्पशा पावसानंतर या प्रकल्पाचे बांधकाम खचण्यास सुरुवात झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या स्वप्नपूर्तीकडे वेळीच लक्ष न दिल्यास लाखमोलाचा हा प्रकल्प मातीमोल होण्यास फार अवधी लागणार नाही.

सुधीर मुनगंटीवार यांना पंढरपूर विषयी अध्यात्मिक आस्था आहे त्याचं कारण म्हणजे श्री विठूरायाची अर्धांगिनी श्री रुक्मिणीमाता ही विदर्भातील आहे. या भावनिक आणि अध्यात्मिक विचारधारेतून सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पंढरपूरमध्ये काहीतरी ऐतिहासिक काम व्हावे या उदात्त हेतूने तुळशी वनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर ‘दैनिक सामना’ने या जागेला आक्षेप घेऊन प्रकल्प अन्यत्र उभारण्याची सूचना केली होती. ‘सामना’च्या बातमीची सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर जागेविषयी दिशाभूल करणारी माहिती देऊन या विषयाला पूर्णविराम दिला. पण वरुणराजाने वन अधिकारी आणि नगरपरिषदेची पोलखोल केली. पावसाचे पाणी या प्रकल्पाच्या जमिनीत मुरले आणि संतांच्या मंदिरासाठी बांधलेले बांधकाम सहा ते आठ इंच जमिनीत गाडले गेले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची स्वप्नपूर्ती ज्या जागेवर उभारली जात आहे ती जागा यमाई तलावाची खोदाई करून निघालेल्या काळ्या मातीचा भराव आहे. वीस ते तीस फुटांपर्यंत या भागात जमिनीला धर नाही. या धर नसलेल्या जागेवर वन विभागाकडून अवजड बांधकाम उभारले जात आहे. वारकरी भाविकांना डोळ्यासमोर ठेऊन उभारल्या जात असलेल्या तुळशी वनात सात प्रमुख संतांची मंदिरे, २५ फुटीची श्री विठ्ठलाची मूर्ती, ऍम्पीथेटर, कारंज, विविध संतांची भित्तिचित्रे उभारली जाणार आहेत.
























































