उष्णतेचा त्रास होतोय? उत्तम आरोग्यासाठी अवलंबा सोपे उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानामुळे अनेकांना अंगाची लाही लाही होणे, थकवा, छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू लागते. अशावेळी सतत कोल्ड ड्रिंक्स किंवा बर्फाच्या पदार्थांवर अवलंबून राहण्यापेक्षा, आहार आणि जीवनशैलीत काही साधे बदल केल्यास शरीराला नैसर्गिक थंडावा मिळू शकतो. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात शरीरातील पित्त वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शरीर थंड ठेवणारे पदार्थ आणि योग्य सवयी अंगीकारणे आवश्यक मानले जाते.

उन्हाळ्यात उपलब्ध होणारी हंगामी फळे शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतात. कलिंगड, खरबूज, नाशपाती, सफरचंद, बेरी आणि प्लम्स यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ही फळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात आणि उष्णतेपासून आराम देतात.

अनेकजण कामाच्या व्यापामुळे वेळेवर जेवत नाहीत किंवा जेवणामध्ये खूप अंतर ठेवतात. त्यामुळे शरीरातील पित्तदोष वाढू शकतो आणि जळजळ किंवा उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे ठराविक वेळेत संतुलित आहार घेण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात त्वचेला अतिरिक्त काळजीची गरज असते. खस, चंदन आणि चमेलीच्या तेलाचा वापर केल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच आंघोळीपूर्वी खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मऊ राहते आणि शरीरालाही आराम मिळतो.

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी अनेकजण बर्फाचे किंवा फ्रीजमधील पाण्याचे सेवन करतात. मात्र आयुर्वेदानुसार याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी मातीच्या माठातील पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. हे पाणी नैसर्गिकरीत्या थंड असते आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते.

उन्हाळ्यात शरीर निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी फक्त थंड पेये पुरेशी नसतात. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि काही नैसर्गिक उपाय अवलंबल्यास उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.