माथेरानच्या राणीला लागल्या उन्हाच्या झळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माथेरानच्या प्रसिद्ध मिनी ट्रेनला पारदर्शक असे काचचे आच्छादन असलेले ‘व्हिस्टाडोम कोच’ अलीकडेच बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला खरा, परंतु सध्या उन्हाचा जोर वाढत असल्याने या डब्याच्या काचेतून प्रवाशांना उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे या ‘व्हिस्टाडोम कोच’ला आता ‘सन कंट्रोल फिल्म’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नेरळ ते माथेरान धावणाऱ्या गिरीस्थानक असलेल्या निसर्गरम्य माथेरान परिसरातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी मिनी ट्रेनला काचेचे आच्छादन असलेले व्हिस्टाडोम कोच बसविण्यात आले आहेत. 3 मार्चपासून माथेरानच्या राणीला हे परदेशी गाड्यांप्रमाणे पारदर्शक कोच प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत, परंतु या कोचेसमधून उन्हाळ्यात जास्त चटके बसत असल्याने पडदे लावण्यात आले आहेत. परंतु यामुळेही भागत नसल्याने आता या पारदर्शक छताच्या डब्यांना सन कंट्रोल फिल्म लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही फिल्म लावून तिच्यातून प्रकाशाचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.