इजिप्तमध्ये सापडले 4500 वर्ष जुने सूर्यमंदीर, इतिहास संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी

इजिप्तमधल्या वाळवंटी भागात तिथल्या इतिहास संशोधकांनी जबरदस्त शोध लावला आहे. अबू गोराब नावाच्या शहराजवळ इतिहास संशोधक उत्खननाचे काम करत होते आणि तिथे त्यांना एक अख्खं मंदीर सापडलं आहे. हे मंदीर सूर्याचं असून ते 4500 वर्ष जुनं असल्याचं सिद्ध झालं आहे. गेल्या संपूर्ण दशकातील इतिहाससंशोधनातील हा सर्वात मोठा शोध असल्याचं मानलं जातंय. हे सूर्यमंदीर फॅरोने बनवलं होतं असं संशोधकांनी म्हटलं आहे.

इजिप्तमध्ये आतापर्यंत 2 सूर्यमंदीरे सापडली आहेत. वॉरसॉ इते असलेल्या अकॅडेमी ऑफ सायंन्सेसमध्ये इजिप्तोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.मासिमिलानो नुजोलो यांनी म्हटले की आम्ही अशा प्रकारच्या संशोधनासाठी बराच वेळ देत असतो. जेव्हा केव्हा असं संशोधन होतं तेव्हा ते संपूर्ण संस्कृती, तिथली सभ्यता आणि त्यावेळच्या स्थापत्य विज्ञानावर प्रकाश टाकत असतं असं नुजोलो यांनी म्हटलं. त्यावेळच्या स्थापत्य विज्ञानाकडे पाहिल्यास थक्क व्हायला होतं आणि बरंच काही शिकायला मिळतं असंही ते म्हणाले.

इतिहास संशोधकांच्या मते हे मंदीर उभारणीचं काम पाचव्या फॅरोने तो जिवंत असताना बनवून घेतलं होतं. आपल्याला देवाचा दर्जा मिळावा हा त्यामागचा उद्देश होता असंही संशोधकांचं म्हणणं आहे. यापूर्वी इजिप्तमध्ये सापडलेल्या सूर्यमंदीरामुळे तशी अजूनही मंदिरे असावीत अशी शक्यता निर्माण झाली होती. कालांतराने अशी एकूण 6 मंदिरे इजिप्तमध्ये असतील असा अंदाज बांधला गेला. ही मंदिरे शोधून काढण्याचं काम सध्या सुरू असून त्या शोधादरम्यानच हे मंदीर सापडलं आहे.

अबू गोराबजवळ सापडलेलं मंदीर हे न्यूसिरी इनी नावाच्या फॅरोच्या काळातलं आहे. न्यूसिरी याने इसवीसन पूर्व 25 ते इसवीसन पूर्व 30 असं राज्य केलं होतं. या मंदिराचा बारकाईन अभ्यास केल्यानंतर संशोधकांना कळालं की मंदिराच्या निर्माणासाठी मातीने बनविलेल्या विटा वापरण्यात आल्या होत्या. मंदिराचा पाया हा दोन फूट खोल होता आणि तो चुन्याच्या दगडाने बनविण्यात आला होता. इतिहास संशोधकांनी मिळालेल्या अवशेषांच्या आधारे हे मंदीर कसं दिसत असावं याचा कॉम्प्युटरवर एक आराखडा तयार करून चित्रही तयार केलं आहे. जे पाहिल्यानंतर हे मंदीर अत्यंत सुंदर असावं याची सहजपणे कल्पना येते. मंदीर परिसरात संशोधकांना बिअरचे जारही मिळाले आहेत. या जारमधून सूर्यदेवतेला बिअर अर्पण केली जात असावी असा अंदाज आहे.