
रणजी सामन्यांमध्ये सातत्याने शतकी प्रदर्शन करूनदेखील सरफराझ खानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघामध्ये स्थान देण्यात आले नाही. सरफराझ सातत्याने उत्तम खेळीचे प्रदर्शन करूनदेखील त्याला डावलले जात आहे. जर तुम्ही फक्त स्लिम-ट्रिम खेळाडूंना संघात स्थान देणार असाल तर, तुम्ही फॅशन शोमध्ये जायला हवे. तेथून मॉडेल्स निवडा आणि त्यांच्या हातात बॅट, बॉल देऊन त्यांना संघात सामील करा, अशा बोचऱया शब्दांत हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी निवड समितीचे कान टोचले आहेत. सरफराझ खानने रणजी ट्रॉफीमध्ये सातत्याने शतकी खेळी केली आहे. असे असतानादेखील त्याला निवड समितीकडून डावलले जाते. अनेक दिग्गज खेळाडूंनी सरफराझला हिंदुस्थानी कसोटी संघात स्थान मिळायला हवे असे मत व्यक्त केले आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गावसकर यांनी सरफराझला पाठिंबा दर्शवला आहे.

























































