हॉलीवूड कलाकाराचा मराठी बाणा; सुनील नारकर मराठी चित्रपट निर्मितीत

जाहिराती, टीव्ही शो आणि चित्रपटांतून हॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मराठमोळे कलाकार सुनील नारकर यांचा वरळी ते लॉस एंजलिस हा प्रवास थक्क करणारा आहे. गेली 36 वर्षे अमेरिकेत राहूनदेखील त्यांनी मराठीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. आजवर अनेक मराठी नाटकांना त्यांनी अमेरिकेत प्लॅटफॉर्म मिळवून दिला. मायमराठीच्या याच प्रेमापोटी आता ते मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण करत आहेत.

मूळचे वरळीकर असलेल्या सुनील नारकर यांचा रुईया महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेताना नाटकांशी संबंध आला. बँकेतील नोकरीनिमित्ताने विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत त्यांची गट्टी जमली. त्यांनी अनेक आंतरनाटय़ स्पर्धांत भाग घेतला. पुढे ‘गजरा’, ‘ज्ञानदीप’, ‘मिश्किली’ आदी मालिकांतही सुनील यांनी काम केले. 1986 साली वडिलांच्या उपचारानिमित्ताने त्यांना अमेरिकेत जावे लागले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथे अभिनयाची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. ‘फेसबुक’, ‘अॅपल’, ‘मॅक्डोनाल्ड’ सारख्या कंपनीच्या जवळपास 57 कमर्शियल, टेलिव्हिजन सीरिज आणि हॉलीवूडपटांतून ते घराघरात पोहोचले.

हॉलीवूडमध्ये चांगला पैसा आणि प्रसिद्धी मिळत असतानाही मराठी नाटकांना आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी माझी धडपड सुरू होती, असे ते सांगतात. आपल्या ‘नाटक डॉट कॉम’च्या माध्यमातून 1998 पासून त्यांनी ‘मोरूची मावशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘व्यक्ती आणि वल्ली’पासून ते अलीकडच्या ‘कुर्रर’, ‘आमने सामने’, ‘परफेक्ट मर्डर’ अशा गाजलेल्या नाटकांचे प्रयोग अमेरिकेत आयोजित केले आहेत.

मराठी चित्रपट निर्मितीतील पदार्पणाविषयी ते म्हणाले, इतकी वर्षे मी हॉलीवूडमध्ये काम केले तरी मराठी चित्रपट आणि नाटकांविषयीची माझी ओढ तसूभरही कमी झाली नाही. अमेरिकेत मराठी नाटकांच्या प्रयोगानिमित्त सतत मराठी कलाकारांशी माझा संपर्क असायचा. डिसेंबरमध्ये प्रसाद खांडेकर याने मला फोनवरुन चित्रपटाचे कथानक ऐकवले. सस्पेन्स कॉमेडी जॉनरचे हे कथानक भावल्याने मी लागलीच निर्मितीसाठी होकार कळवला. मराठी मातीसाठी काहीतरी करण्याची माझी अनेक वर्षांपासून होती, तो योग यानिमित्ताने जुळून आल्याचे ते सांगतात.

सुनील नारकर आणि श्री नारकर यांच्या ‘नारकर फिल्म्स अॅण्ड एंटरटेन्मेंट’ने नुकतीच आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात सुरू झाले असून शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर सांभाळत आहेत. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.