सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केलेय,सुनील प्रभू यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या सभागृहात उद्योग, कायदा-सुव्यवस्था, एसआयटी, सलीम कुत्ता अशा विषयावर चर्चा होते, पण सर्वसामान्यांच्या प्रश्नावर चर्चा कधी करणार? सामान्यांचे म्हणवणारे हे सरकार सर्वसामान्याला भेडसावणाऱ्या महागाईला  आळा घालण्यासाठी नेमके काय करणार, असा सवाल शिवसेनेचे  मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला.

महागाईवर बोलताना सुनील प्रभू यांनी 2014 आणि 2023 मधील अन्नधान्यांच्या दरांचा तक्ता सादर केला.   गरीबाच्या थाळीतून डाळ, भात, भाजी गायब झाली आहे, सर्वसामान्य गृहिणीला या महागाईला तोंड द्यावे लागते. विद्यमान शासनाच्या काळात टोमॅटो, कांदा, तांदूळ महागले, भाज्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे मुख्यमंत्री शिंदे सांगतात, पण इथे जगणे मुश्कील झाले आहे, असे प्रभू म्हणाले.

अदानींचे टेंडर रद्द करा

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बोलताना त्यांनी मुंबई वाचवायची असेल तर अदानीला दिलेले टेंडर रद्द करा. सर्वसामान्यांना घरे द्या अशी मागणी केली. राज्याबाहेर जाणारे उद्योग थांबवण्याची गरज व्यक्त केली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली.