अब्दुल सत्तारांवर कडक कारवाई व्हायला हवी – खासदार सुनील तटकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जितेंद्र आव्हाड हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर खोटे गुन्हे लावण्यात आले. त्यापेक्षा पाचवेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ करत टीका करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली. सुनील तटकरे आज दिशा समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्याचे राज्यसरकार हे अस्थिर आणि अस्वस्थ आहे, अशी टीका खासदार तटकरे यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय विचारपूर्वक महाविकास आघाडी केली होती. काँग्रेसने त्यांना साथ दिली. आता कार्यकर्त्यांकडूनच आगामी निवडणूका महाविकास आघाडीकडून लढवाव्यात अशी मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी होण्याची शक्यता तटकरे यांनी व्यक्त केली.

उदय सामंतना राष्ट्रवादी काँग्रेसचा जास्त अभ्यास
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बारा तेरा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे जाहीर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, खरंतर उदय सामंतनी आमदारांचा आकडा जास्त सांगायला हवा होता. कारण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभ्यास जास्त आहे. कारण ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आमदार झाले. मंत्री झाले. पालकमंत्री झाले, असा टोला त्यांनी हाणला.