नवाब मलिकांनी देवगिरी बंगल्यावर घेतली अजित पवारांची भेट, तटकरे म्हणाले….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे वादग्रस्त नेते नवाब मलिक यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीचं नेमकं कारण काय याबाबात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे

टाईम्सच्या वृत्तानुसार, सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीत उपमुख्यमंत्री अजित पवार व नेते नवाब मलिकांची भेट झाली. नवाब मलिक मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने आल्याचे तटकरेंनी सांगितलं. मतदारसंघातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी ही भेट होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राजकारणावर चर्चा झालेली नाही. असं तटकरे यांनी सांगितले.यावेळी नवाब मलिक यांची मुलगी सनाही उपस्थित होती.

नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती. देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यावर महायुती सरकारवर प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 7 डिसेंबर रोजी नवाब मलिकांना अजित पवार गटात सहभागी करून घेण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस यांनी असेही निदर्शनास आणले होते की मलिक यांच्यावर गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत – त्यांना 22 फेब्रुवारी रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.