राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या गँगवार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या गँगवार सुरू आहे. कोणीच कोणाचे ऐकत नाही. राज्य सरकारला पॉलिसी पॅरलेसीस झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या भीमथडी जत्रेला आज सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार हे सध्या शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत, तसेच त्यांनी भाषणात शरद पवार यांनी वयाच्या 38व्या वर्षी घेतलेल्या भूमिकेचा देखील उल्लेख केला आहे. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, या दोन्ही गोष्टीत फरक आहे. 38व्या वर्षी जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. हा वेगळा निर्णय घेताना काँग्रेस पक्षातील अनेक लोक त्यांच्या बरोबर होते. मात्र, भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. शालीनीताई पाटील यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच 38 व्या वर्षी ज़ेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांच्या मागे माझ्या आणि दादांसारखी घराणेशाही नव्हती. शरद पवार यांच्यावर टीका केली की गेले साठ वर्ष हेडलाईन होतेच. त्यामुळे त्यात काही गैर नाहीये, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.

…तर दादांनी शेतकऱयांना कर्जमाफी मिळवून द्यावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जर दादांचे ऐकत असतील तर, त्यांनी राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी मिळवून द्यावी, असे आवाहनही सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले.