
सामना ऑनलाईन । सुरत
चोरीचा आरोप असलेल्या ओमप्रकाश पांडे या तरुणाचा कोठडीत झालेल्या मारहाणीनंतर शनिवारी रात्री मृत्यू झाल्यामुळे आता याप्रकरणी फरारी झालेल्या आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कोठडीत मारहाण झाल्यामुळे मेंदूला मार बसलेल्या ओमप्रकाश याचे खासगी रुग्णालयात निधन झाल्याचे विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त पी. एल. चौधरी यांनी सांगितले. यापूर्वी फरारी आठ पोलिसांवर हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आता भारतीय दंड विधान कलम 320 नुसार खुनाचा आरोप पोलिसांवर नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून त्यात निरीक्षक एम. बी. खिलेरी यांच्यासह तपास पोलीस कर्मचारी हरेशभाई, कनकसिंह, परेशभाई, आशीष, कल्पेशभाई आणि दिलूभाई यांचा समावेश आहे, मात्र या प्रकरणातील आरोपी उपनिरीक्षक (सर्व्हेलन्स) यांचे नाव अद्याप उघड केलेले नाही. हे सर्व पोलीस खातोदरा पोलीस ठाण्याचे आहेत.

























































