
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना नाशिक येथील तुलसी नेत्ररोग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शांताबाई यांच्या डोळ्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना वृद्धाश्रमात दाखल केल्यापासून त्यांच्या डोळ्यांवर शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. शांताबाईंच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतु ती शस्त्रक्रिया गुंतागुंतींची असल्यामुळे त्यांना नाशिक येथील तुलसी नेत्ररोग रुग्णालयात दाखल केले. येथील नेत्ररोगतज्ञ डॉ. संगीता काकडे यांनी शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या मोफत शस्त्रक्रियेसाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी मोलाचे सहकार्य केले.
एकेकाळी तमाशाचे फड गाजवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा गायिका व नॄत्यागंना शांताबाई कोपरगावकर यांचा काही दिवसांपूर्वी उदिग्न अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्याविषयी सविस्तर फेसबुक वर पोस्ट करून त्यांची हलाखीची परिस्थिती जगासमोर मांडली. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. समाजातील अनेक घटकांकडून निराधार, बेवारस शांताबाई कोपरगावकर यांना मदतीचा ओघ सुरू झाला. सध्या शांताबाई शिर्डी येथील आश्रमात आहेत.



























































