
खारघर दुर्घटनेचे वास्तव जसजसे पुढे येत आहे, तसतसे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराचा राजकीय इव्हेंट केल्याचे स्पष्ट होत आहे. 14 कोटींचे टेंडर दिलेल्या कंपनीने सबटेंडर दिले. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या बळीची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयोजक असलेल्या खासगी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
संवेदनशील विषयावर राजकारण करू नका, असे म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खारघर दुर्घटनेचे विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप करत आहेत. मात्र, लाखो लोकांचा इव्हेंट घेऊन उपमुख्यमंत्री ही दुर्घटना घडल्यानंतर एक सदस्य समिती कोणत्या तोंडाने नेमत आहेत? खारघर दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयोजक खासगी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सरकारने योग्य चौकशी केली नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, शिंदे गटात प्रचंड संख्येने वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वाचाळवीरांवर उत्तर देण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.


























































