अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपनेच लिहलेली, सुषमा अंधारे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्यावरून सुरू झालेल्या चर्चांना अजित पवार यांनी आज पूर्णविराम लावला. जिवात जीव असेपर्यंत… शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार!’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. ‘अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपनेच लिहलेली होती’ अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे.

‘वज्रमूठ सभा, खेड, मालेगाव, संभाजीनगर, नागपूर येथील सभांमधूम महाविकास आघाडीला जो प्रतिसाद मिळत आङे. ते पाहून भाजपला धडकी भरली आहे. चंद्रशेखऱ बानवकुळे यांच्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट होत आहे. आधी त्यांनी काय वक्तव्य केली आहेत, नंतर काय केली. या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस मौन बाळगून आहेत. पण त्यांचं हे मौन रहस्यमयी आहे. त्यामुळे त्यांनी कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला तरी अजित पवारांच्या नाराजी नाट्याचा स्क्रिप्ट रायटर कोण हे देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

अजित पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या बातम्या निराधार असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी आज त्यांच्याबाबत उठणाऱ्या वावड्यांना स्वतःच पूर्णविराम दिला. ‘मी कुठेच जाणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. जिवात जीव असेपर्यंत… शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार!’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याने गेल्या काही दिवसांपासून उडणारा धुरळा खाली बसला आहे. 40 आमदारांच्या सह्या मी घेतलेल्या नसून त्यात यत्किंचितही तथ्य नाही, असेही अजित पवार यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले.