40 गद्दारांपैकी अनेकांची मुले राजकारणात; मग हपापलेले कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जोडे पुसण्याची लायकी नसलेले सरकार चालवत आहेत’ अशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलीच झोंबली. त्यावर त्यांनी ट्विट करत आज प्रतिक्रिया दिली. मात्र शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्या प्रतिक्रियेच्या चिंधडय़ा केल्या. शिंदे यांच्या ट्विटची भाषा ही भाजपच्या नेत्याची असून 40 गद्दारांपैकी अनेकांची मुले राजकारणात आहेत, मग हपापलेले कोण, असा सवाल अंधारे यांनी केला.

तैवानची पादत्राणे बनवणारी कंपनी महाराष्ट्राशी करार केल्यानंतरही मिंधेंच्या निष्क्रियतेमुळे तामीळनाडूत गेली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिंदे यांचे हे ट्विट आले. त्यातील मजकुरावरून अंधारे यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले. देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्टरायटरने ते ट्विट लिहून दिले आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा मुलगा राजकारणात येतो आणि खासदार होतो, रामदास कदम यांचा मुलगा राजकारणात येतो आणि आमदार होतो, भरत गोगावलेंचा मुलगा राजकारणात सक्रिय होतो. यांच्या कुणाच्याही मतदारसंघात दुसरे कुणी राजकारण करण्यास सक्षम नाही का, असा खोचक सवाल त्यांनी केला.

जोडय़ांचा कारखाना महाराष्ट्राबाहेर कसा गेला?

जोडय़ांचा कारखाना, जोडे पुसणे या सगळय़ा शाब्दिक कोटय़ांना दुसरे वळण देण्यापेक्षा तो उद्योग महाराष्ट्राबाहेर कसा गेला ते आधी सांगा. 2 हजार 300 करोडचा उद्योग महाराष्ट्राबाहेर गेला त्यात तुमचा दोष नाही कसा ते सांगा, अशी विचारणा करतानाच उद्योजकांशी बोलण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा वेळ दिल्लीश्वरांची मर्जी संपादन करण्यात जात आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.

सर्वसामान्य शेतकऱयांच्या शेतात कधीपासून हेलिपॅड आले?

सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री शिंदे स्वतःला सर्वसामान्य शेतकरी म्हणवतात. सर्वसामान्य शेतकऱयांच्या शेतात कधीपासून दोन हेलिपॅड दिसायला लागले आहेत? शेतकऱयांची आर्थिक अवस्था इतकी चांगली कधीपासून झाली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री ज्या दरे गावात राहतात त्या गावात साधे नीट रस्ते नाहीत असे वास्तवही त्यांनी मांडले.

राजकारणात वकूब असणारी माणसे एकाच कुटुंबातील असली तरी ती चालू शकतात. जसे नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी चालू शकतात. तसेच प्रबोधनकार ठाकरे हे प्रचंड वकुबाचे नाव होते, तर प्रबोधनकार ठाकरेंच्या नंतर बाळासाहेब ठाकरे हे वकुबाचे नाव होते. ठाकरे घराण्यातील चौथी पिढी म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेसुद्धा वकूब सिद्ध करत आहेत, असे अंधारे म्हणाल्या.