
खारघर दुर्घटनेप्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी होत असेल तर कोरोना काळात झालेल्या मृत्यूंबद्दलही तसाच गुन्हा दाखल केला पाहिजे असे ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना खुले पत्र पाठवून सहा प्रश्न विचारले. कोरोना हा निसर्गनिर्मित होता, खारघर दुर्घटना सरकारनिर्मित आहे, अशी आठवणही त्यांनी या पत्रातून राज ठाकरे यांना करून दिली.
सुषमा अंधारे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यानंतर ते व्हायरल झाले. पत्राच्या सुरुवातीलाच अंधारे यांनी ‘‘खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना आपण व्यक्त झालात हे बरे झाले,’’ असा चिमटा राज ठाकरे यांना काढला आहे. इंटरनेटच्या युगातही आपण पत्रलेखनाची प्राचीन परंपरा जतन करत असल्यानेच पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
‘‘खारघर घटनेबाबत कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणे समायोचित आहे. पण त्यानंतर कोरोना काळात हलगर्जीपणा झाला म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाषा करून आपण सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त झालात. त्यासंदर्भात हे प्रश्न उद्भवले आहेत,’’ असे अंधारे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना भेटायला का नाही गेलात?
ज्याचं जळतं त्यालाच कळतं असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रात मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांचे उदाहरणही दिले आहे. त्या म्हणतात, आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधे खरचटलेही नव्हते तरीसुद्धा आपण काय तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. बापरे, आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमे वारंवार दाखवत होते. दादा, खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना आपण असेच धावतपळत भेटायला गेलात का नाही?
अंधारे यांनी विचारलेले प्रश्न
– कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच. पण खारघरमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकारनिर्मित आहे.
– भारतरत्नसारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढय़ा मोठय़ा गर्दीची आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले नव्हते?
– श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे-फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका, असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते?
– कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खासगी पीएम केअर फंडमध्ये निधी द्या असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?
– गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असतानासुद्धा मंदिरे उघडलीच गेली पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून राज्यातली व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का?
– सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती, वारी बंद होती तशी आंबेडकर जयंतीसुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढय़ा गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का?
…मग योगींवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का?
कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल जगभरात घेतली गेली. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. याउलट उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेते तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. या हलगर्जीपणासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण काही सुतोवाच करणार आहात का, असाही सवाल अंधारे यांनी राज ठाकरे यांना केला.


























































