मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला शेणाचा अभिषेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये अनुदान देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. शिरोळ तालुका व परिसरात दूध संकलन ठप्प राहिले मात्र शासनाने या आंदोलना संदर्भात अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यने तालुक्यातील कुरुंदवाड येथील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरातून शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढली. पालिकेसमोरील मारुती चौकात संतप्त झालेल्या आंदोलकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजिटल पोस्टरवर शेणाचा अभिषेक घालून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल होऊन आंदोलकांना हटवले यावेळी आंदोलक आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीबाबत पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास शिरोळ तालुका आणि परिसरात तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बंदमध्ये सहकारी दूध संस्था, खाजगी दूध व्यावसायिक दूध उत्पादक व शेतकरी सामील झाल्याने स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावा गावात, चौकात दूध गोळा करून मोफत वाटण्यात आले यावेळी तालुक्यातून दुधाचा एक थेंबही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जाऊ दिला नाही.

कुरुंदवाड येथे शेतकऱ्यांसह दूध खरेदी केंद्र, संघांनीही संकलन न केल्याने आंदोलनाची धार वाढली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध करत शहरातून शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढली. तर काही ठिकाणी दूधाचे मोफत वाटप करण्यात आले. येथील पालिकेसमोरील मारुती चौकात संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्यातल्या बळीराजाला न्याय देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजीटल पोस्टरवर शेणाने (गाय विष्ठा)अंघोळ घालून शेणाचा अभिषेक केला. यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाणेचे सपोनि कुमार कदम, उपपोलिसनिरीक्षक अण्णासाहेब शिंदे, प्रेमकुमार केदार,यांनी पोलीस फौज फाटा घेऊन चौकात आले आणि आंदोलकांना हटवून पोस्टर ताब्यात घेतले पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली त्यामुळे कांही काळ तणाव निर्माण झाला होता.