कोल्हापूर, सांगलीतील कारखान्यांनी 15 लाख शेतकऱयांचे पैसे दिल्याशिवाय उसाचं एक कांडं कारखान्यात जाणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर व सांगली जिह्यांतील 15 लाख शेतकऱयांचे कोटय़वधी रुपये कारखानदार देणे लागतात. दिवाळीपूर्वी दोन जिह्यांतील 37 कारखानदारांनी या जिह्यातील शेतकऱयांना पैसे दिले नाहीतर उसाचं एक कांडंसुद्धा कारखान्यात जाणार नाही अन् साखरेचं एक पोतही कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासा चौगुले यांना निवेदन दिले.

मागील उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये मिळावा व राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल केल्याशिवाय ऊसगाळपास परवानगी देऊ नये. या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली आक्रोश पदयात्रा हुपरी (ता. हातकणंगले ) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यावर धडकली, यावेळी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, एका कारखानदाराच्या विरोधात आमचा संघर्ष नसून ताळेबंदात बनावट हिशेब दाखवून राज्यातील लाखो शेतकऱयांची 4 हजार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया कारखानदारांच्या विरोधात आहे. खुल्या बाजारपेठेत साखरेचे दर 3800 रुपयांच्या घरात आहेत. तरीही सांगली, कोल्हापूर जिह्यांतील साखर कारखान्यांनी शेतकऱयांना केवळ एफआरपीच दिली आहे. त्यामध्येही गुरुदत्त, दत्त व जवाहर कारखान्यांनी 3 हजारांच्या आतच दर देऊन शेतकऱयांची फसवणूक केली आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

दरम्यान, या ‘आक्रोश यात्रे’दरम्यान संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेत मोठय़ा प्रमाणात गोंधळ घालत आमदार प्रकाश आवाडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पाण्याच्या बॉटलची फेकाफेक करीत व्यासपीठासाठी तयार करण्यात आलेला ट्रक्टर प्रवेशद्वाराच्या आत घुसवण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.

साखर वाहतूक करणाऱया ट्रकवर दगडफेक

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील आक्रोश पदयात्रेतील तरुणांना साखर वाहतूक करणारा ट्रक व जळालेला ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर दिसला. यावेळी संतप्त झालेल्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी या ट्रकवर दगडफेक करीत काचा फोडल्या. तसेच ट्रकमध्ये चढून साखरपोती व ट्रक्टरच्या ट्रॉलीतील ऊस विस्कटण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व उपनिरीक्षक गणेश खराडे आदींनी समयसूचकता दाखवून संतप्त जमावाला बाजूला करून ट्रकसह साखर व ऊस वाचविला.

मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चेला तयार

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राजू शेट्टी म्हणाले, सर्वच कारखान्यांनी आपल्या ताळेबंदात साखरविक्रीचा हिशेब चुकीच्या पद्धतीने दाखवून शेतकऱयांची दिशाभूल केली आहे. साखरविक्रीचा खरा हिशेब शेट्टी यांनी सांगून प्रतिटन 400 रुपये दर वाढवून देता येतात, हे सांगितले. तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निमंत्रणाचा स्वीकार आपण करीत असून हिशेबासाठी कारखान्यांवर आपण कधीही येण्यास तयार असल्याचे सांगितले.