
येथील क्रॉमर पार्क मैदानावर शनिवारी रात्री विमानाचा अपघात झाला. या अपघातातून स्थानिक क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटू थोडक्यात वाचले आहेत. कोसळणारे विमान बघून मैदानावरील खेळाडू जीव मुठीत घेऊन दूर पळाल्याने मोठा अनर्थ टळला.
हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सिडनीतील ज्या ऑलिम्पिक पार्क हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे त्या हॉटेलपासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर ही घटना घडली. विमान क्रॅश होऊन ज्या मैदानाजवळ कोसळले तेव्हा तेथे क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने सुरू होते. विमान त्यांच्या दिशेने खाली येताना पाहून खेळाडू घाबरून सैरावैरा पळू लागले. क्रॉमर क्रिकेट क्लबचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग रोलिन्स म्हणाले, विमान खाली पडत असल्याचे बघून मी शेडमधील खेळाडूंना ओरडून सांगतिले की पळा पळा. त्यानंतर खेळाडू आपला जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तसे धावत सुटले. अपघातग्रस्त विमान हे फ्लाइंग स्कूलचे होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते क्रॅश झाले होते. या विमानातून 12 जणांना लगेच बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.




























































