
अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर उद्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिली उपांत्य लढत सुस्साट खेळ करणारा इंग्लंड आणि स्पर्धेत लढाऊ बाण्याने खेळणाऱया न्यूझीलंड संघांत रंगणार आहे. ही लढत म्हणजे 2019च्या विश्वचषक अंतिम लढतीची पुनरावृत्तीच ठरणार आहे. उभय संघांची गोलंदाजी आणि फलंदाजी समतोल आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपल्या अष्टपैलुत्वाची झलक पेश करीत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली आणि न्यूझीलंडचे कसलेले फलंदाज यांच्यातील व किवीजचा फिरकीवीर ईश सोधी, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि इंग्लंडचे फॉर्मात असलेले फलंदाज यांच्यातील झुंज उद्या पाहण्यासारखी ठरणार आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांत होणार आहे. स्पर्धेतील इंग्लंड संघाची कामगिरी पाहता त्यांचे पारडे जड मानले जात आहे. दोन्ही संघांनी सुपर-12 फेरीत प्रत्येकी 4 सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने प्रतिक्रिया दिली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला मात देऊ, असा विश्वास ट्रेंट बोल्टने व्यक्त केला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांतील विश्वचषकातील सामना नेहमीच अटीतटीचा होतो असा आजवरचा इतिहास आहे. उद्या त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे संकेत आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड 2019 वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत किताब पटकावला होता. दोन वेळा हा सामना अनिर्णित ठरला होता. त्यानंतर चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. यामागील पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू जिवाचे रान करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
जेसन रॉयची अनुपस्थिती चिंताजनक
इंग्लंड संघाचा धडाकेबाज फलंदाज गंभीर दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याची अनुपस्थिती इंग्लंडला जाणवणार आहे. मात्र कर्णधार इऑन मॉर्गन, अष्टपैलू मोईन अली, फॉर्मात असणारा डेव्हिड मालन, जोस बटलर आणि जॉनी बेयरस्टो यांच्यावर इंग्लंड संघाची भिस्त असेल. वेगवान गोलंदाजीत मार्क वूड, ख्रिस वोक्स, टॉम कुरेंन यांच्यावर तर फिरकी विभागाची मदार मोईन अली यांच्यावर असेल.
न्यूझीलंड संघाचे यश या लढतीत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, टीम सौदी आणि फिरकीवीर ईश सोढी यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. अबुधाबीच्या मंद खेळपट्टीवर हे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना कमी धावांत रोखू शकले तर न्यूझीलंडला या लढतीत विजयाची अपेक्षा बाळगता येणार आहे.
आजची उपांत्य लढत
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, अबूधाबी, रात्री 7ः30 वाजता
























































