
सामना ऑनलाईन । बडोदे
इलेव्हन स्पोर्टस् राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी चमक दाखवत एक सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.
हिंदुस्थानचा तिसरा मानांकित दीपित पाटील याने मुलांच्या 17 वर्षांखालील सांघिक गटात संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात आपले योगदान दिले होते. त्याने एकेरीतही चमक दाखवत सुवर्णपदकाची कमाई केली. स्थानिक खेळाडू चित्राक्स भट याच्याविरुद्ध खेळताना त्याने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. दीपित पाटीलने पहिला गेम 11-3 असा जिंकत चांगली सुरुवात केली. दुसऱया गेममध्ये त्याला 9-11 असे पराभूत व्हावे लागले, पण दीपितने पुढचे दोन्ही गेम 11-4, 11-5 असे जिंकत सामन्यात विजय मिळवला. त्यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात दीपितने दिल्लीच्या श्रेयांश गोयलला 3-1 असे नमवत अंतिम फेरी गाठली होती.



























































