
तलासरी तालुक्यातील काजळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात १९ वर्षीय तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी चार आरोपींना याआधी अटक केली होती. तर आज एका आरोपीला अटक केली. आरोपींना डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सामूहिक अत्याचार प्रकरणाची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी तत्काळ दखल घेतली. प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथके नेमली. पोलिसांच्या पथकांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा माग काढला. या प्रकरणाचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड करत आहेत.
अपघातात जखमी झालेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान फॉरेन्सिक टीमने महत्त्वाचे पुरावे जमा केले असून त्याआधारे तपास सुरू आहे.
मुख्य आरोपीला नवी मुंबई येथून अटक
मुख्य आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला १० ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथून अटक केली. मुख्य आरोपीला ११ ऑगस्ट रोजी डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुख्य आरोपीच्या चौकशीनंतर तपासाला वेग आला.





























































