अत्याचार करणारा ‘काका’ गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
child

सामना प्रतिनिधी । मुंबई

10 वर्षांच्या मुलावर ओळखीच्याच तरुणाने लैंगिक अत्याचार केला होता, पण भीतीपोटी तो कोणाला काही सांगत नव्हता. जो काका दुचाकीवरून फिरवतो, खाऊ देतो त्यानेच असे केल्याने त्याला धक्का बसला होता. दरम्यान, त्याच्या शाळेत मुंबई पोलिसाच्या पोलीस दीदींची मीटिंग झाली. त्या वेळी पोलीस दीदींनी सांगितलेले ऐकून त्या मुलाला हिंमत आली आणि त्याने घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे त्याच्यावर अत्याचार करणारा नराधम गजाआड झाला.

पीडित मुलगा वरळीत राहत असून ताडदेव येथील एका पालिकेच्या शाळेत शिकतो. सोमवारी त्या शाळेत पोलीस दीदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी महिला उपनिरीक्षक पूनम जाधव, कॉन्स्टेबल म्हेत्रे व एका एनजीओच्या वैशाली यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टचबाबत माहिती दिली. ते ऐकल्यानंतर चौथी इयत्तेत शिकणाऱया मुलाला हिंमत मिळाली आणि त्याने पोलिसांना त्याच्यावर घडलेली आपबिती सांगितली. हाजीअली परिसरात अजिज मोहम्मद शेख (35) ऊर्फ अंगू या काकाचा धंदा आहे. तो नेहमी मला दुचाकीवरून फिरवतो, खाऊ देतो. पण 26 तारखेला तो मला एका शौचालयात घेऊन गेला आणि तेथे त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, असे मुलाने सांगितले. हा प्रकार कळताच ताडदेव पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून अंगू याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास करीत असल्याचे ताडदेव पोलिसांनी सांगितले.