टार्गेट किलिंगमुळे कश्मिरातील सरकारी कर्मचारी घाबरले, काही सुट्टीवर गेले तर काही सुट्टीशिवाय गुपचूप घरी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगमुळे कश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. कश्मीरमध्ये तैनात असलेले जम्मू विभागातील अनेक सरकारी कर्मचारी आपल्या घरी परतले आहेत. सध्या अनेकांनी अधिकृतरीत्या काही दिवसांची सुटी घेतली आहे तर काहीजण न सांगता आपल्या घरी पोहोचले आहेत. आता काश्मीरमध्ये नोकरी करायला भीती वाटत असल्याचे ते सांगत आहेत. त्यांची बदली व्हावी असा त्यांचा आग्रह आहे.

अलीकडे कश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगने थैमान घातले आहे. काहीदिवसांपूर्वी रजनी बाला या महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती. काश्मिरी पंडित राहुल भट यांची कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच बाहेरील राज्यातील मजुरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. कश्मीर खोऱ्यातील हिंदूंना लक्ष्य केल्याच्या विरोधात काश्मिरी पंडित आणि अल्पसंख्याकांनी निदर्शने केली होती.

जम्मू-काश्मीरमधून बदली करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने सरकारी कर्मचारी पुन्हा जम्मूमध्ये आले आहेत. कश्‍मीरमधील विविध जिल्ह्यांत तैनात असलेले एलआयसी कर्मचारी काही दिवसांपूर्वी सुटी घेऊन घरी आले होते. जम्मूत आल्यानंतर त्यांनी मुख्यालयात जाऊन बदलीची विनंती केली. मात्र त्यांना यासंदर्भात योग्य उत्तर देण्यात आले नाही.

सततच्या हत्यांमुळे लोक भयभीत झाले असून कर्मचारी घरातच बसून आहेत. कश्मीरला गेलो तर मरू असे त्यांचे म्हणणे आहे. बँक मॅनेजरच्या हत्येनंतर हे लोक जम्मूमध्ये आले होते. सांबा जिल्ह्यातील एका शिक्षकाचीही अशीच अवस्था आहे. तोही रजनी बाला यांच्या हत्येनंतर घरी आला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नोकरी सोडण्यासही सांगितले आहे.