
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलींवरील वादग्रस्त डॉक्युमेंटरी प्रसारित केल्याच्या काही आठवड्यांनंतर आयकर अधिकार्यांनी BBC ची चौकशी सुरू केली आहे. दिल्ली आणि मुंबईतील BBC च्या कार्यालयांची झडती सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली.
BBC (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ने कर्मचार्यांना एका ईमेलमध्ये, त्यांच्या प्रसारण विभागाशिवाय सर्वांना घरून काम करण्याचे आवाहन केले. ‘वैयक्तिक उत्पन्नावरील प्रश्नांची उत्तरे देण्यास कर्मचारी बांधिल नाहीत. मात्र त्यांनी पगाराशी संबंधित इतर प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. तसेच सर्वसमावेशकपणे प्रश्नांची उत्तरे द्या’, असा सल्ला BBC ने आपल्या कर्मचार्यांना दिला.
स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, ‘आम्ही जगभरातील माध्यम स्वातंत्र्याचं महत्त्व जाणतो आणि त्याचं समर्थन करतो. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व आणि धर्म किंवा श्रद्धा यांचे महत्त्व अधोरेखित करत आहोत जे जगभरातील लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देतात. या देशात या लोकशाहीने हिंदुस्थानची लोकशाही मजबूत केली आहे’.
दरम्यान, यूकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मंगळवारी सकाळी ‘सर्च’ सुरू करण्यात आले. रात्रभर तपास सुरूच होता. आता दुसऱ्या दिवशीही तपास सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की, BBC कडून अनधिकृत कर लाभ, करचोरी आणि नियमांचे पालन न करणे या आरोपांची आयकर अधिकारी चौकशी करत आहेत. BBC ला याआधीही नोटीस बजावण्यात आली होती परंतु त्यांनी पालन केले नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.
मंगळवारी, व्हिज्युअलमध्ये काही कर्मचारी अधिकार्यांशी वाद घालताना दिसले आणि त्यांच्यावर वॉरंटशिवाय प्रवेश केल्याचा आरोप केला.
कर्मचाऱ्यांना लॉग इन करण्यास सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी डेस्कटॉपवर माहिती शोधण्यासाठी “TAX” हा कीवर्ड (Keyword) वापरला, असे बीबीसीच्या पत्रकाराने सांगितल्याचं एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे.
‘आयकर अधिकारी नवी दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात आहेत. BBC च्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आले आहे, परंतु काहींना तिथेच थांबण्यास सांगितले गेले आहे आणि ते चालू असलेल्या चौकशीत सहकार्य करत आहेत’, असे BBC न्यूज प्रेस टीमने 10 वाजता ट्विट केले होते.

























































