
तेलुगू देसम पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री अखिला प्रिया यांना पोलिसांनी अटक केली आहे. 3 व्यापाऱ्यांच्या अपहरण प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी हैदराबादमधील 3 व्यापारी बंधूंचे अपहरण करण्यात आले होते. हे व्यापारी तेलंगाणाचे मुख्यमंत्री असलेल्या के चंद्रशेखर राव यांच्या स्वीय सहाय्यक वेणूगोपाळ राव यांचे नातेवाईक आहेत. जमिनीच्या वादातून अखिला प्रिया यांनी या व्यापाऱ्यांचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हैदराबादमधील हाफीजपेट भागात असलेल्या 25 एकर जमिनीच्या तुकड्यावरून अखिला प्रिया आणि या व्यापारी बंधूंमध्ये वाद सुरू होता. या जागेतील हिस्सा अखिला प्रिया यांना हवा होता. त्यांची ही मागणी व्यापारी बंधूंनी धुडकावून लावली होती. मंगळवारी रात्री बोवनपल्ली भागात असलेल्या मनोविकासनगरातील व्यापारी बंधूंच्या राहत्या घरी 10-15 जण घुसले होते. आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत त्यांनी व्यापारी बंधूंच्या कुटुंबीयांना एका खोलीत बंद करून ठेवलं आणि घराची झडती घेण्याचा बहाणा करत प्रवीण राव, सुनील राव आणि नवीन राव यांना वेगळ्या खोलीत थोडावेळ बसवून ठेवलं. या तिघांना चौकशीसाठी नेण्याच्या बहाण्याने या अपहरणकर्त्यांनी तिघांचे अपहरण केलं. अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांमधील प्रवीण राव हे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहेत.
या तिघांना घरातून नेल्यानंतर व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तिघांची शोधमोहीम सुरू केली होती. जागोजागी नाकाबंदी करण्यात आल्याने आपण या व्यापाऱ्यांना डांबून ठेवण्यासाठी गुप्त ठिकाणी नेऊ शकत नाही याची अपहरणकर्त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी बुधवारी पहाटे 3.30 वाजता या वापाऱ्यांना रस्त्यात सोडून दिलं होतं.
पोलिसांना तपासादरम्यान अखिला प्रिया यांच्यावर संशय यायला लागला होता, त्यामुळे त्यांनी तिला ताब्यात घेतलं. 2016 सालापासून अखिला आणि राव बंधूंमध्ये वादाला सुरुवात झाली होती. प्रवीण राव यांनी हाफीजपेट भागात 25 एकर जमीन घेतली होती. या जमीन प्रकरणी एव्ही सुब्बा रेड्डी आणि भूमा नागी रेड्डी यांचे काही वाद होते. प्रवीण राव आणि रेड्डी यांच्यातील वाद दूर झाले होते. मात्र रेड्डी आणि भूमा नागी रेड्डी यांच्यातील वाद कायम राहिले होते. भूमा नागी रेड्डी हे अल्लागड्डा भागात दहशत असलेलं व्यक्तिमत्व होतं आणि ते अखिला प्रिया यांचे वडील होते. अखिला यांची आई शोभा रेड्डी या देखील पूर्वी मंत्री होत्या.
भूमा नागी रेड्डी यांच्या मृत्यूनंतर अखिला यांनी प्रवीण राव यांच्याकडे जमिनीचा हिस्सा मागायला सुरुवात केली होती. राव यांनी त्यास नकार देत तुमचा वाद हा एव्ही सुब्बा रेड्डी यांच्याशी असून तो तुम्ही त्यांच्याशी बोलून सोडवा असं सांगितलं. अखिला या सुब्बा रेड्डी यांच्याकडे गेल्या असता रेड्डी यांनी प्रवीण आणि त्याच्या भावांचं अपहरण करण्याचा कट रचला. अखिलाही या कटात सहभागी झाल्या होत्या.
























































