लॉकडाऊनमध्ये शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती; संस्थाचालकांविरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
teacher-1
प्रातिनिधिक

पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तरीदेखील राज्यभर टाळेबंदी सुरू असताना क्षुल्लक कारणांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांवर विनाकारण शाळेत येण्याची सक्ती काही संस्थाचालक करीत आहेत. याविरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

मुंबईतील शाळांमधील 70 टक्के शिक्षक हे कल्याण, कर्जत, कसारा, पालघर आणि पनवेल परिसरात राहणारे आहेत. काही शाळांमधून त्यांना शाळेत येण्याच्या पाळ्या ठरवून दिल्या असून एक दिवसाआड तर काही ठिकाणी दररोजच शाळेत विनाकारण बोलवले जात आहे. टाळेबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करतील आणि इतर कार्यालये बंद राहतील असे राज्य सरकारचे आदेश असतानाही शिक्षकांना शाळेत येण्याची जबरदस्ती केली जात आहे.

शिक्षकांना शाळेत न बोलावण्याविषयी शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून कोणत्याही सूचना न आल्याचे कारण पुढे करत किंवा ‘ब्रेक द चेन’बाबत शाळेला परिपत्रक न आल्याचे सांगत तसेच शाळा हा शब्द कुठेच नसल्याचा युक्तिवाद करत शिक्षकांना शाळेत बोलावले जात आहे, असे शिक्षण परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले. सध्याच्या घडीला शाळांमध्ये कोणतेही तातडीचे काम नसून सरकारच्या टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱया आणि शिक्षकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या शाळाप्रमुखांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.