बदली द्या, नाहीतर घटस्फोट द्या, शिक्षक जोडप्यांचे अनोखे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । मुंबई

परस्परांपासून विभक्त राहून नोकरी करणाऱया शिक्षक जोडप्यांनी आता अनोखे आंदोलन पुकारले आहे. एकाच जिल्ह्यात विनाविलंब बदली द्या, नाहीतर घटस्फोट द्या, असे पत्र महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीने राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिले.

राज्यात शिक्षकांसाठी आंतरजिल्हा व जिह्याअंतर्गत बदल्यांचे धोरण राबविण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून या बदल्या ऑनलाइन करण्यात येतात, पण तरीही अनेक शिक्षक पती-पत्नीला या धोरणाचा फायदा झालेला नाही. पण राज्यातील अनेक शिक्षक पती-पत्नी 10 ते 15 वर्षांपासून वेगवेगळय़ा जिल्ह्यात नोकरीनिमित्त काम करीत आहेत. शिक्षक पती-पत्नीची जिल्ह्याअंतर्गत बदली करताना 30 किलोमीटरच्या परिघात करण्याचे निर्देश आहेत, पण तरीही अनेक शिक्षक पती-पत्नी दोनशे ते एक हजार कि.मी. लांबच्या जिह्यात राहून नोकरी करीत असल्यामुळे कुटुंबव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

नोकरीनिमित्त विलग झालेल्या या शिक्षक पती-पत्नींना एकत्र आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पत्नी-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून ग्रामविकासमंत्री व महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. शिक्षक पती-पत्नी परस्परांपासून दूर राहून नोकरी करीत असल्याने त्यांच्या आयुष्यात प्रापंचिक वाद निर्माण होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत गेली आहेत.

सतत आत्महत्येसारखे विचार मनात येतात
सततच्या प्रवासाने अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत, काही जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आई-वडील असूनही मुले अनाथासारखे जीवन जगत आहेत. नोकरीच्या ठिकाणी एकटय़ा राहणाऱया महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यातून अनेक महिला शिक्षकांना मानसिक त्रास होत असून सतत आत्महत्येसारखे विचार मनात येत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर शिक्षकांच्याही सह्या आहेत.