वेतनश्रेणी, भत्ते ठरविण्याच्या सरकारी निर्णयाला शिक्षकांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार, इतर भत्ते, वेतनश्रेणी ठरविण्याच्या सरकारी निर्णयाला राज्यभरातील शिक्षकांनी विरोध केला असून या निर्णयाविरोधात राज्यभरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य खासगी शाळांतील कर्मचारी (सेकेच्या शर्ती) विनियमन अधिनियम 1977 आणि नियम 1981 मधील मसुदा बदलण्याची अधिसूचना नुकतीच सरकारने जाहीर केली, मात्र यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

शिक्षण व्यवस्था उलथवणाऱ्या या मसुद्याची अधिसूचना रद्द करण्यासाठी राज्यभरातून शिक्षक भारती सह्यांची मोहीम राबवणार आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. 4 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्यातील सर्व संघटनांनी एकत्रितपणे यावर मोठय़ा प्रमाणावर हरकती नोंदवण्याचे आवाहन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले आहे. शिक्षकांचे पगार संकटात टाकणाऱ्या मसुद्याची अधिसूचना लाखो हरकती नोंदवूनही शासनाने रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारतीने दिला आहे.