वांडरर्सवर वादळ, हिंदुस्थानच्या अष्टपैलू कामगिरीपुढे दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यू वांडरर्सच्या खेळपट्टीवर नव्या दमाच्या खेळाडूंसह झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर हिंदुस्थानी गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांचेही वादळ घोंघावले आणि तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना हिंदुस्थानने आठ विकेट आणि 200 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. आता दुसरी वन डे 19 ला तर तिसरी 21 डिसेंबरला खेळली जाईल.

टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यानंतर सर्वांचे लक्ष वन डे मालिकेवर लागले होते. हिंदुस्थानची नवोदित वेगवान जोडी अर्शदीप सिंह आणि आवेश खानने 64 धावांत आफ्रिकेचे 9 फलंदाज बाद करत त्यांचा डाव 116 धावांत गुंडाळला आणि त्यानंतर 117 धावांचे माफक आव्हान 2 फलंदाजाच्या मोबदल्यात अवघ्या 16.4 षटकांत गाठत हिंदुस्थानला जबरदस्त सुरुवात करून दिली. 37 धावांत दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद करणारा अर्शदीप ‘सामनावीर’ ठरला.

आज दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्या षटकातील सलग चेंडूवर रिझा हेंड्रिक्स आणि रॅसी वॅन डर डय़ुसेनला बाद करत हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. 2 बाद 3 अशा दयनीय प्रारंभानंतर आफ्रिकन डावाला कुणी सावरू शकला नाही आणि अर्शदीप आणि आवेशच्या भेदक माऱयाने यजमानांना पाय रोवण्याचीही संधी दिली नाही. कर्णधार एडन मार्करम (12), हेन्रीक क्लासन (6) आणि डेव्हिड मिलर (2) या दिग्गजांनाही आपल्या डावाला आधार देता आला नाही. झॉरझी (28), मार्करम (12), आंदिले पेहलुक्वायो (33) आणि तबरेझ शम्सी (11) या चौघांचा अपवाद वगळता अन्य आठ फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.

17 व्या षटकांत 117
हिंदुस्थानसाठी 117 धावांचे आव्हान फारच छोटे होते. पण ऋतुराज गायकवाड (5) बाद झाल्यावर आफ्रिकन गोलंदाज वन डेत रंगतदार आणतील असे वाटले, पण साई सुदर्शन (ना. 55) आणि श्रेयस अय्यर (52) यांनी कोणताही धोका न पत्करता सहजगत्या 88 धावांची भागी रचत सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव निश्चित केला. श्रेयसने 45 चेंडूंत 52 धावा काढल्या तर सुदर्शनने 43 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या. विजयापासून सहा धावा दूर असताना ही जोडी फुटली. पण 17 व्या षटकांत तिलक वर्माने एकेरी धाव काढत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या नऊ विकेटस् अर्शदीप-आवेशच्या
आफ्रिकेच्या डावातील पहिले 9 विकेटस् अर्शदीप आणि आवेशच्या गोलंदाजीचे होत्या. अर्शदीपच्या पाच विकेट्सनंतर आवेश खानलाही पाच विकेट टिपण्याची संधी होती. 8 बाद 73 अशी केविलवाणी अवस्था असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा शंभरीतच खुर्दा पाडणार असे वाटत होते, पण पेहलुक्वायो आणि नांद्रे बर्गरने 28 धावांची भागी रचून संघाला शंभरी गाठून दिली. मग अर्शदीपने पेहलुक्वायोला पायचीत करत यजमानांची 9 बाद 101 अशी अवस्था केली. हे या नऊ विकेट अर्शदीप आणि आवेशनेच टिपल्या होत्या. एकीकडे अर्शदीपचा स्पेल संपला होता, पण आवेश खानची 2 षटके शिल्लक होती. पण आवेशला आफ्रिकेचा डाव संपवता आला नाही आणि कुलदीप यादवने बर्गरचा त्रिफळा उडवत आफ्रिकेचा डाव 116 धावांवर संपवला.