
सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथील इमारतीत राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीयूष नितीन संचेती (वय 34, रा. चिंतामणीनगर, तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार प्रभाकर गौडा (वय 31, रा. साकानाका, बंगलोर), सोनल सुनील सदरे (वय 29, रा. आंबेगाव बुद्रक,मूळ-भराडगल्ली, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तेजसा श्यामराव पायाळ (वय 29, रा. फ्लॅट क्रमांक 15, माणिकबाग ,मूळ- बीड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
शवविच्छेदनातील प्राथमिक अहवालात तेजसाचा 30 नोव्हेंबरला गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. दोन दिवसांपुर्वी राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमाही आढळून आल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी सिंहगड पोलिसांनी तिघांना अटक केली.
दोन दिवसांपूर्वी माणिकबागेतील रामकृष्ण सोासायटीत उच्चशिक्षित तेजसाचा खून उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. नोकरीच्या शोधात एम.बी.ए. शिक्षण घेतल्यानंतर तेजसा काही महिन्यांपूर्वी पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबागेत तेजसासह आई व दोन बहिणी समवेत वास्तव्यास होती. आठ दिवसांपूर्वी ती एकटीच पुण्यात आली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास तीन मित्रांसमवेत घरात होती. त्याच रात्री तेजसाचा खून झाल्याचे निषन्न झाले आहे. त्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तिघाजणांना अटक केली असून चौकशी सुरु केली आहे.
खूनाचे कारण अद्यापही अस्पष्ट
उच्चशिक्षित तेजसाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना अटक केली आहे. मात्र, अद्यापही तेजसाचा खून का करण्यात आला. याबद्दल ठोस कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे खूनामागे अजून कोण आहे काय याबाबत सिंहगड पोलीस तपास करीत आहेत.

























































