टेंभुर्णीत रेशनचा साडेनऊ लाखांचा गहू आणि तांदूळ जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा तालुक्यातील मोडनिंब बाजार समितीमधील आडत व्यापाऱयाने ट्रकचालक व क्लीनरच्या मदतीने बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी चालवलेला 9 लाख 44 हजार रुपये किंमतीचा रेशनचा माल टेंभुर्णी पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आडत मालक, ट्रकचालक व क्लीनरविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोडनिंब बाजार समितीतील गोरख पांडुरंग सुर्वे आडत दुकानाचे मालक सतीश माणिक सुर्वे (रा. बैरागवाडी, ता. माढा ), ट्रकचालक रामेश्वर भगवान देठे (वय 23, रा. बीड), क्लीनर तुषार गोवर्धन फड (वय 21, रा. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मोडनिंब बाजार समितीतील एका आडत दुकानातून रेशनिंगचा गहू व तांदूळ ट्रकमध्ये भरला जात असल्याची माहिती टेंभुणीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता गोरख पांडुरंग सुर्वे या आडत दुकानासमोर ट्रकमध्ये गव्हाच्या गोण्या भरत असल्याचे दिसून आले. पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक निंबाळकर, तहसीलदार राजेश चव्हाण, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार यांना माहिती दिली.

पुरवठा निरीक्षक कुंठलवार, तलाठी वैभव पाटील, महेश राऊत, राजेंद्र चव्हाण येथे आले. त्यांनी ट्रक व गोडावूनमधील गहू, तांदळाची तपासणी केली. त्यानंतर बाजार समितीतील वजनकाटय़ावर ट्रकमधील गव्हाचे वजन केले असता 4 लाख 25 हजार रुपये किमतीचा 25 हजार 80 किलो गहू, तसेच गोडावूनमधील 350 गोण्यांमध्ये अंदाजे 20 टन म्हणजे 3 लाख 40 हजार रुपयांचा गहू व 1 लाख 79 हजारांचा 150 गोण्यांमधील 12 टन तांदूळ जप्त केला. या गोण्यांची तपासणी केली असता त्यावर ‘गव्हर्नमेंट ऑफ पंजाब’ असा शिक्का आढळूला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले तपास करीत आहेत.