कासारखेडात महादेव मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

जिल्ह्यात मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरीच्या घटना होत असतात. मात्र, कासारखेड्यात पाण्यातून पोहत जात महादेव मंदिराचा सोन्याचा कळस चोरण्यात आला. मंदिरावरील 10 तोळे सोन्याचा कळस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लातूर तालुक्यातील कासारखेडा हे गाव मांजरा नदीकाठी वसलेले आहे. गावालगत असलेल्या या महादेवाच्या मंदिरात पाण्यातूनच जावे लागते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या कळसावरही डल्ला मारला आहे. 10 तोळे सोने आणि तांबे या धातूंपासून बनवलेला कळस त्यांनी लंपास केला. शनिवारी दुपारी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दोन वर्षांपूर्वी याच मंदिराचा सुमारे 100 वर्षापूर्वींचा मौल्यवान कळस चोरीला गेला होता. दरम्यान, आतापर्यंतही यामधील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. मंदिराच्या आवतीभोवती पाणी असल्याने प्रवेश करणेही मुश्किल होते. शिवाय गावाबाहेर मंदिर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराजवळ रात्री कोणीही नसते. मात्र, याचाच फायदा घेत चोरट्यांनी कळस चोरला आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.