नऊ कोटींच्या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडून कुठे गायब झालात? शिंदे गटाचे आमदार थोरवेंविरोधात आदिवासींचा खालापुरात ठिय्या; आंदोलनानंतर प्रशासनाची पळापळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूरच्या माडप मुठा ठाकूरवाडीसाठी नऊ कोटींच्या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडला. मात्र निवडणुका होताच रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो आदिवासींनी आपल्या टुंबकबिल्यासह रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. कामाचा नारळ फोडून कुठे गायब झालात? असा संताप व्यक्त करत आदिवासींनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यामुळे पळापळ झालेल्या प्रशासनाने तत्काळ रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे लेखी पत्र दिले.

खालापूर तालुक्यातील माडप मुठा ठाकूरवाडी या डोंगराळ भागात ६०० हून अधिक कुटुंबांची आदिवासी वाडी आहे. या वाडीच्या रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून नऊ कोटी निधी मंजूर करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर वाजतगाजत आमदार महेंद्र थोरवे यांनी भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती, मात्र हा फक्त दिखावाच ठरला असल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी चार किलोमीटर डोंगरातून मजल-दरमजल करीत आपल्या लहान मुलांसह गावच्या वेशीजवळ ठिय्या आंदोलन केले. याची दाखल घेत अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आदिवासींचा आत्मदहनाचा इशारा

रस्त्याला काँक्रीटीकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली होती, मात्र या मार्गावर काँक्रीटीकरण न करता डांबरीकरण करावे असे या रस्त्याचा ठेका घेतलेले ठेकेदाराचे म्हणणे होते. मात्र वन विभागाच्या अधिकारी वर्गाने अशी कोणतीच अट नसून आमची रस्त्याच्या कामाला काहीही अडचण नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांना सांगितले. यावेळी जोरदार घोषणा देत आदिवासींनी आत्मदहनाचा इशारा दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, पोलीस निरीक्षक सचिन पवार, उपअभियंता आर. के. चव्हाण, कनिष्ठ अभियंता निकिता गुरव, स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक राहुल चौरे, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, सरपंच अर्चना पाटील, आदिवासी समाज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी उपस्थित होते.