बंजारा समाजाचे प्रश्न न सोडवल्यास राज्यव्यापी आंदोलन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, तांडा सुधार योजना, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे अनेक प्रश्न सरकार दरबारी गेल्या चार वर्षांपासून पडून आहेत. तांडा वस्ती निधीबाबतही भाजपची भूमिका दुटप्पीपणाची आहे. हे प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल तसेच भाजप नेत्यांना तांडाबंदी करू, असा इशारा बंजारा समाजाने दिला आहे.

बंजारा समाजातील युवकांच्या विकासासाठी 30 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र पुरेशा निधी अभावी या महामंडळाला उतरती कळा लागली आहे. अनेकदा प्रयत्न करूनही समाजातील तरुणांना व्यवसायाकरिता कर्ज मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. तर नॉन क्रिमिलेअरच्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तांडा विकासनिधी बंद करून तो गावाकडे वळवला आहे. समाजाला विकासापासून दूर ठेवण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप बंजारा समाजाचे ठाणे, पालघर जिल्हा संघटक सुधीर राठोड यांनी केला आहे. बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही तर आगामी निवडणुकीत भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुधीर राठोड यांनी दिला आहे.