
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिका समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्याचे गोडे पाणी तयार करणार आहे. गेल्या वर्षभरापासून याची निविदा प्रक्रिया रखडली होती, मात्र मुंबई महापालिका आता येत्या 15 दिवसांत निविदा काढणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला सध्या 4 हजार 500 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत आहे, मात्र त्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांची संख्या मर्यादित आहे. दरम्यान, मुंबईची पाण्याची समस्या सोडवणारा सांडपाण्यावरील जलशुद्धीकरण प्रकल्प आणि समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवणारा गोडे पाणी प्रकल्प रखडले आहेत. हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत आणि मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे वर्षभरापूर्वी पत्र लिहून केली होती.
उंच इमारती, उत्तुंग टॉवरची संख्या वाढली
मुंबईत गेल्या काही वर्षांत उंच इमारती आणि टॉवरची संख्या सातत्याने वाढत आहे. हॉटेल आणि सेवा उद्योगांचाही मोठय़ा प्रमाणात विस्तार होत आहे. रहिवासी प्रकल्पांबरोबरच भेंडी बाजार, धारावी पुनर्विकासासारखे समूह पुनर्विकासाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढत जाणार आहेत. शिवाय क्लायमेंट चेंजमुळे पाऊस लांबत असून भविष्यात केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे पालिका मुंबईसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधत आहे.
13 हजार कोटींचा प्रकल्प
खाऱ्या पाण्यापासून खनिजे आणि मीठ वेगळे करून पिण्याचे पाणी तयार केले जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने मालाडमधील मनोरी येथे जागाही निश्चित केली आहे. 12 हेक्टर जागेवर हा प्रकल्प राबवला जाणार असून हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. प्रकल्पाला सौर ऊर्जेतून वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पाला 13 हजार 28 कोटींचा खर्च येणार आहे. कंत्राटदाराला हा प्रकल्प 4 वर्षांत पूर्ण करायचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून मुंबईकरांना दरदिवशी 400 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
























































