हिंदुस्थानला खरा धोका व्यसनांपासूनच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, इंदापूर

हिंदुस्थानला खरा धोका पाकिस्तान वा चीनपासून नव्हे, तर व्यसनाधिनतेपासून आहे. त्यामुळे युवावर्गाने व्यसनापासून दूर राहावे. व्यसन करायचेच असेल तर ते एखाद्या खेळाचे किंवा ज्यामुळे आपल्या गावाचा, राज्याचा व हिंदुस्थानचा नावलौकीक होईल, अशा बाबीचे करा, असे आवाहन डब्लूडब्लूई प्रकारातील जगप्रसिद्ध भारतीय कुस्तिपटू द ग्रेट खली यांनी रणगाव (ता.इंदापूर) येथे बोलताना केले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीस्पर्धेसाठी द ग्रेट खली रणगाव येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले की, आपण कुस्ती, चित्रपट व जाहिराती चित्रीकरणाच्या निमित्ताने सर्वत्र फिरलो. अमेरिकेत माझे घरही  आहे. मात्र, हिंदुस्थानकडून जसे प्रेम व आपुलकी मिळते तसे प्रेम जगात कोठेही मिळत नाही. हिंदुस्थानचा मला अभिमान वाटतो. आपण लहानपणापासून मातीतील असंख्य कुस्त्या केल्या. याच मातीतून मला आपल्या मातीतील कुस्तीगीर निर्माण करायचे आहेत.

रणगावच्या या कुस्ती आखाड्यात राज्यस्तरापासून स्थानिक कुस्तीगीरांच्या रोमहर्षक लढतींमुळे कुस्तीचा आखाडा रंगला. सात फूट एक इंच उंचीचे, तब्बल 157 किलो वजनाचे गौरकाय खली कुस्तीगीर व कुस्तीशौकिनांच्या आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले होते. या कुस्ती स्पर्धेस खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, इंदापूरचे नगरसेवक पोपट शिंदे यांनी भेट दिली. खासदार सुळे यांच्या हस्ते मुलींच्या कुस्त्या लावण्यात आल्या.

सायंकाळी 4 वाजता लाल मातीच्या भव्य कुस्ती मैदानावर बजरंगबली हनुमान प्रतिमेला ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून कुस्तीला सुरुवात करण्यात आले. मानाच्या निकाली कुस्ती सायंकाळी 9 वाजता घेण्यात आल्या. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी 2 लाख रोख रक्कम व मानाची चांदीचा गदा बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले होते. या लाल मातीच्या आखाड्यात जवळजवळ 300 कुस्तीवीरांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी 7 वाजता जगप्रसिद्ध डब्लूडब्लू वल्र्ड वेट चॅम्पियन दिलीपिंसह राणा-द ग्रेट खली यांचे आगमन रणगावच्या लाल मातीच्या आखाड्यावर होताच, तरुणांनी आपली छबी मोबाईलमध्ये उतरवण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली. बाउन्सर व पोलीस बंदोबस्त योग्य असल्यामुळे खलीच्या सुरक्षिततेत कोणतेही अडथळे निर्माण झालेले नव्हते. आखाडाप्रमुख रणजित पवार मंगलदास बांदल, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई पाटील, महारूद्र पाटील, प्रताप पाटील, लालासाहेब पवार, कांतीलाल जाधव, अशोक राजीवडे, दत्तात्रय फडतरे, उद्योजक अनिल राजीवडे, अंकुश रणमोडे, अशोक घोलप, गुणवंत रणमोडे, राजू महाडिक, महाराष्ट्र केसरी अस्लम काझी यांच्यासह असंख्य तरुण या कार्यक्रमाला उपस्थित होते.