
लॉकडाऊनचा फटका हॉटेल व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात बसला आहे. ग्राहकांची पावले पुन्हा हॉटेलकडे वळावीत यासाठी मालक नानाविध ऑफर्स देतायत. परंतु नेदरलॅंडमधील वुथुइजेन शहरातील डी डॉल्टन्स हे फूड आउटलेट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. कोरोनाच्या या संकटात या आउटलेटने जगातील सर्वात महागडा बर्गर लॉंच केला आहे. या बर्गरची किंमत चक्क 4 लाख 47 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
‘द गोल्डन बॉय’ असे या बर्गरला नाव देण्यात आले आहे. या बर्गरच्या किमतीत महागडे रोलेक्सचे घडय़ाळ खरेदी करता येऊ शकते. जागतिक विक्रम करण्याचे माझे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाल्याचे आउटलेटचे मालक रॉबर्ट जेन डी सांगतात. युरो न्यूजच्या रिपोर्टनुसार या बर्गरच्या बनमध्ये सोन्याचे पान आहे. याव्यतिरिक्त मशरूम, स्टर्जियन माशाची अविकसित अंडी, बदकाच्या अंडय़ातील बलक, डोम पेरीग्नॉन शॅम्पेन याचा वापर बर्गर बनविण्यासाठी करण्यात आला आहे.
यापूर्वी जगातील सर्वात महागडय़ा बर्गरची 2011 साली गिनीज बुकात नोंद झाली होती. हा मान अमेरिकेतील ओरेगॉनमधील जुसीज ऑलटलॉ ग्रील ग्रील या आउटलेटला मिळाला होता. या बर्गरचे वजन 352 किलो होते. त्याची किंमत 3 लाख 72 हजार रुपये इतकी होती. अर्थात हा बर्गर एका व्यक्तीसाठी नव्हता. मात्र ‘द गोल्डन बॉय’ हा बर्गर एका व्यक्तीला खाण्यासाठी बनवण्यात आला आहे.



























































