
सामना प्रतिनिधी । जामखेड
कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. कलावंतानी मासिक मानधनात वाढ करुन प्रत्येक महिन्याला मानधन देण्याची मागणी केली. या नंतर तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.
जामखेड तालुक्यातील कलावंत व कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार दि १९ रोजी सकाळी जामखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाची सुरवात खर्डा चौकातुन रॅली काढून वाजत गाजत जामखेड तहसिल कार्यालयासमोर आला. या मोर्चात किर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ, भारुडकार, आराधी गोंधळी, कलगीतुरा, या सारखे अनेक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मोर्चाचे आयोजन वृद्ध कलावंत सेवा संस्थेचे अध्यक्ष ह भ प बाळासाहेब गाडे व भगवान नागरगोजे यांनी केले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, झेंडे महाराज, संपत महाराज जायभाय, भिमराव पाटील, बबन महाराज, भिमराव वाघ, ह भ प आमृत महाराज डुचे, सह तालुक्यातील कलावंत व कलाकार उपस्थित होते.
या वेळी कलावंतांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात बोलताना म्हटले आहे की वृद्ध कलाकाराला मानधन योजनेसाठी उध्दीष्ट वाढण्यात यावे.जिल्हातील दरवर्षी कमीत कमी ३०० कलाकारांना या योजनेत सहभागी करण्यात करुन घ्यावे. वृद्ध कलाकारांना दरमह शाशासनाने ५००० रुपये पेन्शन अथवा मानधन देण्यात यावे. शासनाने वृद्ध कलाकारांना मोफत आरोग्य सेवा मिळावी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वृद्ध कलाकारासाठी विश्रामीका उपलब्ध करून देण्यात यावी तसेच वृद्ध कलाकारांच्या निधनानंतर त्यांची पेन्शन त्यांच्या पत्नीस व त्यांच्या वारसास मिळावी. वृद्ध कलाकाराची पेन्शन शासनाने नियमित व वेळेवर देऊन जे कलाकार आपल्या कला लोकांसमोर दाखवतात व त्यांचे मने जिंकून घेतात त्यांना महिन्याला शासनाने पेन्शन मिळून द्यावी आशा आनेक मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. या नंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.






























































