फायनान्स कंपनीचे कार्यालय आगीत जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-मनमाड रस्त्यावरील ‘साई मिडास’ व्यापार संकुलाच्या वरच्या मजल्याला भीषण आग लागली. या व्यापार संकुलातील ‘एचडीबी फायनान्स’ कंपनीचे कार्यालय जळून खाक झाले, तर येथील एका रुग्णालयाला आगीची झळ पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली.

आज सकाळी रुग्णालय व फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला अचानक आग लागली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनास्थाळावरून धुराचे लोळ येत असल्याचे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात अडकलेल्या नागरिक व रुग्णांना तातडीने बाहेर काढले व अन्य रुग्णालयांत स्थलांतरित केले. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा एक बंब आणि एमआयडीसीचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन विभागाच्या पथकाने तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. व्यापार संकुलातील ‘चंदूकाका ज्वेलर्स’ या दुकानासह कपडय़ाच्या दुकानाला काही प्रमाणात या आगीची झळ बसली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहर वाहतूक शाखा, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर-मनमाड महामार्गाच्या कडेलाच ही घटना घडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

आगीच्या घटनांना महापालिका अधिकारी जबाबदार

घटनास्थळी आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली. शहरात आगीच्या वारंवार घटना घडत आहेत. याबाबत उपाययोजना होण्याची गरज आहे. प्रत्येक इमारतीचे वार्षिक ‘फायर ऑडिट’ करून घेणे गरजेचे आहे. महापालिकेचे अधिकारी ‘एनओसी’ देतात. मात्र, नंतर आर्थिक तडजोड करून त्याकडे दुर्लक्ष करतात. शहरातील आगीच्या घटनांना महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. महापालिकेच्या आयुक्त, उपायुक्तांच्या जशा बदल्या केल्या जातात, तशा बदल्या इतर विभागांच्या प्रमुखांच्या कराव्यात, अशी मागणी आपण येत्या अधिवेशनात करू, असे आमदार जगताप म्हणाले.