‘या’ देशात अविवाहितांना द्यावा लागतो कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

उत्पन्न मिळवण्यासाठी आणि देशातील नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे कर लावण्यात येतात. त्यातील अनेक करांना विरोधही होतो. तर सुविधा मिळत असल्याने काही कर देण्यासाठी नागरिकही पुढाकार घेतात. मात्र, काही देशात विचित्र प्रकारचे कर आकारण्यात येतात. असे काही देश आहेत, जिथे अविवाहितांना कर द्यावा लागतो. या करातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो. या बॅचलर टॅक्समुळे सरकारला फायदा होत असला तरी या कराला विरोधही होतो.

अमेरिकेतील मिसूरीमध्ये अविवाहितांना बॅचलर टॅक्स म्हणून एक डॉलर द्यावा लागतो. हा कर लावण्यामागे तरुणांना विवाहासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, अनेकजण कर भरणे पंसत करतात. लग्नामुळे स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा अनेकांचा समज असल्याने येथील तरुण लग्नापासून लांबच राहतात. त्यामुळे कर लावण्याशिवाय तरुणांना विवाहासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इतर पर्यायांचा विचार करत आहे.

रोममध्ये नवव्या शतकात सम्राट ऑगस्टस यानेही अविवाहितांवर कर लावला होता. तसेच लग्नानंतर मूल जन्माला न घालणाऱ्या जोडप्यांवरही कर लावण्यात येत होता. या करामुळे सरकारला खूप फायदा झाला. सरकारच्या महसूलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मुसोलिनीने इटलीमध्ये 1927 मध्ये बॅचलर टॅक्स लावला होता. या करामुळे इटलीमध्ये अनेक तरुणांना लग्नासाठी प्रोत्साहित करण्यात आले. इंग्लंड आणि फ्रान्सदरम्यान 1695 मध्ये युद्ध सुरु होते. या काळात इंग्लंडमध्येही हा टॅक्स लावण्यात आला होता. सरकारला या काळात अतिरिक्त निधीची गरज होती. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी इंग्लंडमध्ये हा कर लावण्यात आला होता. या करामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. कॅलिफोर्नियामध्ये 1934 मध्ये बॅचलर टॅक्स लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. कमी होणारी लोकसंख्या वाढवण्यासाठी तरुणांना लग्नासाठी प्रोत्साहन मिळावे, असा सरकारचा हेतू होता. सरकारने 25 डॉलर बॅचलर टॅक्स लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नव्हती.